भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागातील रहिवासी तरूणाचा नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातल्या श्रीराम नगर भागातल्या मृत्यूंजय मंडळाच्या जवळ रहिवासी असणारा योगेश विजयकुमार चौधरी (वय – २०) हा युवक नागपुर येथील कॉलेजमध्ये पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम शिकत होता. काल सायंकाळी सहाच्या सुमारास तो कॉलेज इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यूमुखी झाल्याचा संदेश त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या वडिलांना आला. या कॉलमुळे ते हादरले. यानंतर त्यांनी त्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता मोबाईल बंद आला.
परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांच्या घरी गेले . परिसराचे माजी नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांनी नागपुर येथे संपर्क केला. यानंतर तेथे संपर्क झाला असता त्यांनी चौथ्या मजल्यावरून पडल्याने योगेशचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. दरम्यान, मयत योगेशच्या वडिलांसह आप्तेष्ट आज पहाटे नागपूर येथे पोहचले आहेत.
आपल्या मुलाचे कॉलेजमधील काही जणांशी वाद झाले होते. यातून त्याचा घातपात करण्यात आल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. या संदर्भात आपण पोलीस स्थानकात तक्रार देणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. दरम्यान, मयत युवकाच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.