आंघोळीसाठी गेला असताना घडली घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – धूलिवंदनाच्या सणानंतर अंघोळीसाठी नदीपात्रात गेलेल्या शहराजवळील साकरी फाटा भागातील ११ वर्षीय मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भुसावळ शहर हद्दीतील आरपीडीजवळ नदीपात्रात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.
राजरत्न भिका निकम (११, साकरी फाटा, पेट्रोल पंपाजवळ, भुसावळ) असे मृताचे नाव आहे. राजरत्नसह सोबतचे चार मित्र धुळवडीनंतर अंघोळ करण्यासाठी आरपीडीएममागील नदीपात्रातील डोहात अंघोळीसाठी गेले. मात्र, डोहाचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून मृत्यू झाला. सोबतच्या मित्रांनी ही घटना कुटुंबाला कळवल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. भुसावळमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने साकरी फाटा परिसरात शोककळा पसरली.