भुसावळ तालुक्यातील साकरी येथील घटना
जळगाव प्रतिनिधी – जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात एका विहिरीत दोन अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींना ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यासह जळगाव जिल्हा हादरला आहे. घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण असून ग्रामस्थांनी संशयिताला ताब्यात देण्याची मागणी केली आहे.

साकरी येथे दोन्ही मुली शाळेत शिक्षण घेत होत्या आणि गावातीलच रहिवासी होत्या. आज सकाळी शाळेत जाण्याच्या वेळी ही घटना गावाजवळील एका विहिरीत घडली असून, त्यांना तिथे विहिरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याला भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी आणले असताना त्याला ताब्यात देण्याची तीव्र मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी संशयित आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला असून, यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ग्रामस्थांनी पोलिसांशी वाद घातला असल्याचे सांगितले जाते.दरम्यान, जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला असला तरी, मृतदेह ताब्यात न घेण्याच्या पोलिसांच्या विलंबामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली असून, यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आहे.
पोलिसांनी संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून अधिक तपास सुरू आहे. हत्या का आणि कशा पद्धतीने झाली, याबाबत तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








