भुसावळच्या खडकाचौफुली वरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळातील खडका चौकात कारच्या चाकाचा स्फोट झाल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात आजी आणि नातिचा जागीच मृत्यू झाला. या बालिकेचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. आई-वडिलांवर गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जळगाव खुर्द येथे उपचार चालू आहेत. तर आजी व नातीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला आहे.
भुसावळ येथील अहलुवालिया हा परिवार जळगाव येथे येत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. खडका चौकाजवळ कार आली असता अचानक चाकाचा स्फोट झाला. त्यामुळे कार फेकली जाऊन आजी सुरेंदर कौर अहलुवालिया (वय६८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेली दीड वर्षाची बालिका रुग्णालयात आणत असताना मृत्युमुखी पडली. बिना दीपक अहलुवालिया असे तिचे नाव आहे तर तिचे वडील दीपक अहलूवालिया व आई हे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान आजी व नातीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर यांनी तपासून मृत घोषित केले. घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत असून भुसावळच्या नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. भुसावळ पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असून त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतल्याचे कळत आहे.