जामनेर तालुक्यातील कुंभारी बु.येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर
जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या कुंभारी बुद्रुक येथील सुमारे १५० ते २०० शालेय विद्यार्थ्यांना सायंकाळी शाळा सुटल्यानंतर त्यांच्या गावात परत जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जामनेर आगार प्रमुखांच्या कथित नियोजनशून्य कारभाराविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासपा) जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी ५ किलोमीटरचा पायी प्रवास करून आगळे-वेगळे आंदोलन केले.
कुंभारी बु. येथील हे सर्व विद्यार्थी तोंडापूर येथील जैन विद्यालयामध्ये शिक्षण घेतात. शाळा सायंकाळी ५ वाजता सुटल्यानंतर त्यांना घराकडे जाण्यासाठी एस.टी. बस मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवैध प्रवासी रिक्षातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. नियमांचे उल्लंघन करून एका रिक्षात १२ ते १५ विद्यार्थ्यांना दाटीवाटीने कोंबून प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तोंडापूर-फर्दापूर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर खडी व खड्डे पडलेले असून, अशा परिस्थितीत अवैध वाहनातून प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरत आहे.
या गंभीर समस्येकडे आगार प्रमुखांचे लक्ष वेधण्यासाठी ऑगस्ट महिन्यात रासपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे यांच्याकडून आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनेही वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, आगार प्रमुख उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने आणि बससेवा सुरू न केल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
निवेदनाची आठवण करून देण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजता तोंडापूर येथूनच शालेय विद्यार्थ्यांनी प्रभाकर साळवे यांच्या समवेत ५ किलोमीटर पायी प्रवास केला. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
बससेवा न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
आंदोलकांनी यावेळी आगार प्रमुखांना इशारा दिला आहे.
जर दोन दिवसांत कुंभारी बु.साठी सायंकाळच्या वेळी बस सेवा उपलब्ध झाली नाही, तर तोंडापूरहून फर्दापूरकडे जाणाऱ्या जामनेर आगाराच्या सर्वच बस सेवा आंदोलन करून बंद करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी तातडीने बस सेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि विद्यार्थी संघटना करत आहेत.