जळगाव ( प्रतिनिधी ) – गाडेगाव घाटात शिवशाही बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना ३१ डिसेंबररोजी रात्री घडली. अज्ञात व्यक्तीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव आगाराची शिवशाही (बस क्रमांक एमएच १८ बीजी ८७१) ही औरंगाबाद येथून जळगावकडे येत असतांना ३१ डिसेंबररोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली. यात बसच्या समोरील काच फोडला आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर बसवाहक युवराज प्रधान कोळी व बसचालक रोहन संजय पाटील (वय-२८ , रा. हिंगोणा ता. चोपडा ) यांनी शिवशाही बस थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली. बसचालक रोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गफुर तडवी करीत आहेत.