बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात जानेवारी महिन्यात दुचाकीवर जात असलेल्या एका महिलेचा पाठलाग करून दोन दुचाकीस्वारांनी सुमारे एक लाख रुपयांची सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून ७ सप्टेंबर रोजी एकास जळगाव शहरातून अटक केली आहे.
प्रसाद ऊर्फ परेश संजय महाजन (२७) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून लुटलेली साखळी व गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीचा सध्या एलसीबी शोध घेत आहे. ऋतुजा श्रेयस व्यवहारे (रा. देशपांडे गल्ली, मलकापूर) तक्रार दिली होती. तिच्या गळ्यातील ४० ग्रॅमची सुमारे १ लाख रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी पाठलाग करून लंपास केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा एलसीबीकडूनही समांतर पातळीवर तपास करण्यात येत होता.
प्रकरणात जळगाव खान्देश येथील प्रसाद ऊर्फ परेश संजय महाजन यास अटक करण्यात आली. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचाही सध्या पोलिस शोध घेत असून, प्रसंगी मलकापूर शहरासह बुलढाणा जिल्ह्यातील आणखी काही गुन्ह्यांची या प्रकरणातून उकल होण्याचा प्रयत्न आहे.