जळगावात स्टेडियम येथील जलतरण तलावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जलतरण तलाव येथे एका तरुणाचा पोहताना बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी १८ जून रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला असता तेथे कुटुंबीयांनी व मित्रांनी आक्रोश केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनेची माहिती घेत आहेत.
सलमान शकील बागवान (वय २४, रा. जोशीपेठ, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहेत. तो जोशीपेठेत आई, वडील, भाऊ, तीन बहिणींसह राहतो. फळविक्री करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करतो. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेक मुले हे पोहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जलतरण तलाव येथे गर्दी करीत असतात. रविवारी सलमान बागवान हादेखील त्याच्या मित्रांसोबत पोहण्यासाठी जलतरण तलाव येथे गेला होता. तेथे तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला. काही वेळानंतर सलमान हा काही तरुणांना पाण्याच्या खाली तळाशी दिसला. त्याला तत्काळ बाहेर काढण्यात आले.
मित्रांनी व नागरिकांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी त्यास मृत घोषित केले. यानंतर सलमान बागवान यांच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी आक्रोश केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेची ते माहिती घेत आहेत. दरम्यान, या जलतरण तलावाचे राहुल सूर्यवंशी यांना खाजगी कंत्राट दिलेले असल्याची माहिती मिळाली आहे.