रावेर तालुक्यातील अभोडा बुद्रुक शिवारातील घटना
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बक्षीपूर येथील रहिवासी असलेल्या व आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या केळी व्यावसायिकाचा मृतदेह विहिरीत आढळला. याप्रमाणे रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बक्षीपूर येथील जगदीश ज्ञानेश्वर महाजन (४२) असे मयत इसमाचे नाव आहे. जगदीश हा वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर पुंडलिक महाजन यांचा एकुलता एक मुलगा आहे. पत्नीसह लहान मुलगा व मुलगी यांच्यासह ते राहत होते.(केसीएन)त्यांची पत्नी पल्लवी महाजन यांनी पती घरी जेवायला आले नाहीत म्हणून दीर प्रवीण ईश्वर महाजन व जितेंद्र वासुदेव महाजन यांना त्यांना बोलावून आणण्यासाठी सांगितले. दोन्ही चुलतभावांनी गावात शोध घेतला.
एका विहिरीजवळ त्यांचा मोबाइल, दुचाकी व चप्पल अशा वस्तू दिसल्या. गावातील पट्टीचे पोहणाऱ्यांकडून विहिरीत शोध घेतला असता, जगदीश यांचा मृतदेह आढळला. मृतदेह आभोडा बु, शिवारातील नफ्याने केलेल्या शेतातील विहिरीत आढळला. रावेर पोलीस स्टेशनला सोमवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









