भुसावळ शहरातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील तापी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी दोन अल्पवयीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार २१ मे रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे. दोन्ही तरुण हे १७ वर्षाचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील जाम मोहल्ला येथील शेख दानिश (वय १७), अंकुश ठाकुर (वय् १७) हे दोघे त्यांच्या काही मित्रांसोबत तापी नदी पात्रात पोहण्यासाठी संध्याकाळी गेले होते. राहुल नगर भागाकडील नदीपात्राच्या लहान पुलाजवळ ते पोहत असताना अचानक दानिश आणि अंकुश हे बुडायला लागले. मित्रांनी आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे मासेमारी करणारे नागरिक धावत आले. त्यांनी दोन्ही तरुणांना बाहेर काढले.
त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांस मयत घोषित केले. दरम्यान घटनेची भुसावळ पोलीस माहिती घेत असून दोन्ही मयत तरुणांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात कोसळला आहे.








