चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील सायगाव येथील दोन तरुण धाब्यासाठी खारी घेण्यासाठी गेले होते. तरुणांची बैलगाडी नाल्यात उलटल्याने दोघे तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. राकेश चिला अहिरे (वय १९) व सुखदेव जगन जाधव (वय १८) असे दोन तरुणांचे नाव असुन दोघेही रा. सायगाव ता.चाळीसगाव येथील आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सायगाव येथील राकेश चिला अहिरे ,सुखदेव जाधव रा. सायगाव हे धाब्यावर खारी टाकण्यासाठी बैलगाडी घेवून सतारी शिवारात गेले होते. या दरम्यान बैलगाडीत खारी भरून गावाकडे येत असतांना सतारी नाल्याच्या बंधाऱ्या जवळ अचानक बैलाचा पाय सटकला आणि गाडी उलटून बंधाऱ्याच्या पाण्यात उलटली झाली. यावेळी दोघे तरुणांना पाण्यात पोहता येत नसल्याने पाण्यात बूडून त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्या ठिकाणी बक-या चारणारा अशोक दळवी यांनी सदर माहिती फोनद्वारे गावातील नागरिकांना दिली.लागलीच सायगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बंधाऱ्याच्या आसपासच्या काही जणांनी दोघे तरुणांना पाण्यातून वर काढून ठेवले होते. तेव्हा सतिष निंबा महाजन यांनी लागलीच खासगी वाहनाने पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील खाजगी हाँस्पिटल मध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टर डॉ. वाघ यांनी तपासून दोघे तरुणांना मृत घोषित केले. ही सदर घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सतीष निंबा महाजन यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.