चोपडा तालुक्यात धाडसी घरफोडी
चोपडा (प्रतिनिधी):- चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बुधगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री एका शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्याने धाडसी घरफोडी केली. या घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा एकूण ८ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.


बुधगाव येथील रहिवासी रवींद्र तुळशीराम वाघ (वय ६१, व्यवसाय शेती) हे आपल्या कुटुंबासह राहतात. दि. २० मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रवींद्र वाघ, त्यांच्या पत्नी मंगलाबाई आणि आई इंदुबाई हे जेवण करून झोपी गेले होते. दि. २१ मार्चच्या पहाटे १.३० वाजेच्या सुमारास मंगलाबाई यांना घरातील कपाटाचा आवाज आल्याने जाग आली. त्यांनी कपाटाजवळ जाऊन पाहिले असता, पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला, उंच आणि सडपातळ बांध्याचा एक अज्ञात इसम कपाटातून साहित्य काढत असल्याचे दिसले. मंगलाबाईंना पाहताच चोरट्याने तेथून पळ काढला.
चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता. कपाटाच्या चाव्या तिथेच ठेवलेल्या असल्याने चोरट्याचे काम सोपे झाले. त्याने कपाटातील लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच बाजूच्या खोलीचे कुलूप तोडून तेथील ५००० रुपये रोख (५०० च्या ६ आणि २०० च्या १० नोटा) आणि देवघरातील चांदीची माळही चोरून नेली.
घटनेनंतर मंगलाबाई यांनी आरडाओरडा केल्यावर नातेवाईक ललित पाटील, प्रकाश पाटील आणि प्रवीण पाटील यांनी चोरट्याच्या दिशेने धाव घेतली, मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटा पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब बाळसाहेब घोलप, चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे करत आहेत.









