मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील हलखेडा गावातील एका पाझर तलावात गणेश विसर्जनदरम्यान ३० वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना रात्री उघडकीस आली होती. मात्र अंधार असल्यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास मिळून आला आहे. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हलखेडा येथील पोलीस पाटील अनेश बनेशबाबु पवार (वय-३४) यांनी खबर दिली आहे. दि. २८ रोजी गणेश मुर्ती विसर्जन असल्याने हलखेडा गावी सायंकाळी फिरोज गव्हाणसिंग पवार (वय ३०) हा त्याचे घरातील गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी सिनफाटा जवळील शासकिय पाझर तलाव येथे गेला होता. तेथे त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. गावातील सरपंच, पोलीस पाटील व इतर लोक जमा झाले. काही स्थानिक पोहणाऱ्यांनी पाण्यात जाऊन त्याचा शोध घेतला. परंतु तो मिळुन आला नाही.
शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळी आपाद मित्र नावाळी संघटना, चांगदेव ता. मुक्ताईनगर येथील पथक आले. त्यांनी फिरोज गव्हाणसिंग पवार याचा तलावात शोध घेतला असता दुपारी १२. ३० वा.चे सुमारास फिरोज पवार याचे प्रेत मिळुन आल्याने त्यास पाण्याचे बाहेर काढले. मुक्ताईनगर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावेळी सफौ संतोष चौधरी, पोना प्रदीप इंगळे, पोकॉ सागर सावे, अनिल देवरे यांनी कायदेशीर कार्यवाही केली.