वेबिनारात तीस हजाराहून अधिकांनी घेतले मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) ;- करोनाची लढाई निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. यात आरोग्य, शासन-प्रशासन यंत्रणेबरोबर नागरीकांच्या सकारात्मक चिंतनाचा मोठा सहभाग असणार आहे. मानसिक स्वास्थ्यास सकारात्मक विचारांची उर्जाच या निर्णायक युद्धात करोनाला हरवू शकणार आहे असा आशावाद सुप्रसिद्ध समुपदेशक व वक्त्या सिस्टर बीके शिवानी यांनी ऑनलाईन वेबिनार मध्ये केला.

ब्रह्माकुमारीज्तर्फे `अपनी मुश्किलों से बडे बनो` या ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते त्यात त्या बोलत होत्या. संकटाना न डगमगता आपल्या उच्च सकारात्मक चिंतनाची पातळी वाढविल्यास निश्चित आपण करोनास हरवू शकतो या विषयावर बोलतांना त्या पुढे म्हणाल्यात की, आपले विचार, संकल्प वातावरणात एक प्रकारची उर्जा प्रवाहित करतात, त्या उर्जेने आमच्या मानसिक स्वास्थ्यावर निश्चितच परिणाम होतो. आपण जो विचार करतो त्याचा परिणाम आपल्या शारीरीक स्वास्थावर होतो. आमचे संकल्प दुस-या व्यक्तिंवर प्रभाव टाकतात. आणि जर विचार, संकल्प सकारात्मक असतील तर त्याचा प्रभाव मानसिक आणि शारीरीक स्वास्थावर होतो.
एकच प्रबळ विचार करोनास हरविण्यास पुरेसा :
आपण जे विचार त्याचा वातवरणावर परिणाम होतो, त्यामुळे आपले घर, आपली कॉलनी, शहर आणि देशात बदल होतात. शहराची सकारात्मक उर्जा टिकविणे हे नागरीकांवर अवलंबून असते. आज करोना काळात सर्वत्र नैराश्य, नकारात्मक संकल्प वाढीस लागले असतांना सकारात्मक आणि दिलासादायक संकल्प करणे हे सुदृढ मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यास मदत करतात.
ज्या पद्धतीने घरातील निटनेटकेपणा, टापटिपपणा, स्वच्छतेद्वारे त्या घरातील प्रसन्न वातावरण तेथील सदस्यांच्या निरोगीपणाची जाणीव करुन देते त्याप्रमाणे चांगले, सकारात्मक, आशादायी विचार निरोगी आणि सदृढ मानसिक आरोग्याची ओळख करुन देते. तेव्हा सकारात्मक संकल्प करु या, पहा दोन महिन्यात संपूर्ण देशाचे चित्र आपण बदलवू शकतो.
भोजनास बनवा प्रसाद :
आपले घर मंदिराप्रमाणे प्रसन्न ठेवा. ज्या प्रमाणे परमेश्वरास आपण प्रसाद दाखवितो तसेच सुदृढ मानसिक आरोग्यासाठी भोजन बनवितांना परमेश्वराच्या आठवणीत बनवा आणि ग्रहण करतांनाही परमेश्वराच्या आठवणीत ग्रहण करा. भोजन ग्रहण करतांना तर टीव्ही, मोबाईल बिलकूल पाहू नका.
बातम्यांसाठी केवळ पाच मिनीटे :
आज वर्तमानपत्रे, टीव्ही, मोबाईल मध्ये सर्वत्र नकारात्मक बातम्यांचा पूर आलेला आहे तेव्हा केवळ पाच मिनीटामध्ये बातम्या ऐका, पहा, वाचा. अधिकाधिक वेळ चिंतन, मनन, आणि सकरात्मक साहित्य वाचनात द्या. झोपण्याच्या अगोदर एक तास टिव्ही, मोबाईल पाहू नये आणि उठल्यानंतरही सकाळी एक तास या साधनांपासून दूर रहावे.
पंच संकल्प सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली:
सकाळी उठल्याबरोबर पहिला संकल्प परमात्माचे आभार, दुसरा संकल्प- आपल्या मन आणि शरीराचे आभार, तीसरा संकल्प – कुटुंबाचे आभार. चौथा संकल्प – सर्व लोकांचे आभार आणि पाचवा – प्रकृतीचे आभार. हे संकल्प केल्यास पहा कसा चमत्का होतो. संपूर्ण देशात सकारात्मकतेची लहर येऊन सर्वजण सुदृढ, निरोगी होण्यास मदत होईल.
तीस हजाराहून अधिक नागरीकांनी घेतला लाभ :
वेबिनारात तीस हजाराहून अधिकांनी घेतले मार्गदर्शन
ऑनलाईन वेबिनारचा झुमवर एक हजार तर युट्यूबवर सुमारे तीस हजाराहून अधिक नागरीकांनी लाभ घेतल्याचे माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले. ऑनलाईन वेबिनारच्या प्रारंभी ब्रह्माकुमारी वासंती यांनी प्रास्ताविक केले तर बीके विणा यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी बीके दिपक, मुंबई, बीके दिलीप, बीके विकास नाशिक आणि अनेकांचे सहकार्य लाभले.







