जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील बोरनार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय मिळवला. एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत शेतकरी संघर्ष परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडाला असून त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत विद्यमान चेअरमनसह सहा संचालकांना मतदारांनी नाकारले आहे.
शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख प्रदीप चौधरी यांना ओबीसी प्रवर्गातून २९० मते मिळाली तर सर्वसाधारण गटातून प्रगतशील शेतकरी दिनकर चौधरी यांना सर्वाधिक २५४ इतकी मते मिळाली. शेतकरी विकास पॅनलने राखीव प्रवर्गातील सर्व पाच जागांवर विजयश्री मिळवली. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील आठ पैकी सात उमेदवार दणदणीत मताधिक्य घेऊन विजयी झाले.
यावर्षी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. जिल्हा बँक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विकास सोसायट्यांची निर्णायक भूमिका असते. त्यामुळे जळगाव तालुक्यातील या मोठ्या विकास सोसायटीच्या निवडणुकीकडे तालुक्यातील पुढाऱ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुरेश जैन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक समाधान धनगर यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.
बोरनार विकास सोसायटी निवडणुकीत विद्यमान सहा संचालकांचा धक्कादायक पराभव झाला. त्यात विद्यमान चेअरमन सुरेश जैन, सोजाबाई चिंचोरे, लताबाई पाटील, भोजराज येशे, विनोद कोळी, राजेंद्र वाणी यांचा समावेश आहे. शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. विजयी उमेदवारांसह बोरनारचे माजी सरपंच विष्णूआप्पा चिंचोरे, अंकुश चौधरी, अरुण कोळी, विनायक चौधरी, शेखर बडगुजर, भिका उशीर, धोंडू चौधरी, भिका धनगर, छोटू कोळी, बंडू धनगर, सागर चौधरी, जितेंद्र चौधरी, छोटू देशमुख, बबलू धनगर, मुन्ना पटेल, अन्सार देशमुख, सुनील कुलकर्णी, गणेश पाटील, आबा पाटील आदी उपस्थित होते.
निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते
सर्वसाधारण प्रवर्ग – दिनकर वासुदेव चौधरी- 254,
अशोक खंडू बडगुजर- 239,
अनिल लंबोदर कुलकर्णी 239,
पांडुरंग उत्तम देशमुख- 230,
सिताराम दगडू कोळी 221,
संजय भिला पाटील 220,
रईस गफार देशमुख- 217
प्रदीप देविदास चौधरी- 290(इतर मागासवर्गीय प्रवर्ग),
दीपक छगन धनगर-237 (भटक्या जमाती प्रवर्ग),
हेमराज चिंतामण उशीर- 255 (अनुसूचित जाती प्रवर्ग),
इंदुबाई ओंकार पाटील – 239 (महिला राखीव),
धनगर मीराबाई कौतिक- 221 (महिला राखीव)