मुंबई: बॉम्बे हॉस्पिटलमधील एका डॉक्टरला करोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरने अनेक रुग्ण आणि गर्भवती महिलांवर उपचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने बॉम्बे हॉस्पिटल सील करण्याची मागणी कर्मचारीवर्गाकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
करोनाची लागण झालेला हा डॉक्टर बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागात कार्यरत आहे. या डॉक्टरने अनेक रुग्ण आणि गर्भवती महिलांवरही उपचार केले होते. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या डॉक्टरसह त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांची, त्याचे कुटुंबीय, नातेवाईकांची आणि रुग्णालयातील सर्व स्टाफची तापसणी करण्याची मागणी होत आहे. तसेच हॉस्पिटलसह आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसरही सील करण्याची मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे. दरम्यान, धारावीतही आज एका नर्सला करोनाची लागण झाली असून ही नर्स सुश्रृषा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं.