बिहारच्या दोघा तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल ; गोडाऊन मालक फरार
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील जारगाव शिवारात गोडावूनमधून बोगस रासायनिक खतांच्या विक्रीचा कृषी खात्याच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. धडक कारवाईत २० लाख १९ हजार रुपयांचे ७ टन रासायनिक खते जप्त करण्यात आली आहे.
पाचोरा शहरालगत असलेल्या जारगाव शिवारात एका व्यक्तींच्या गोडावूनमधे गुजरात येथील मिल्सन फार्मास कंपनीने तयार केलेल्या बोगस रासायनिक खतांची विक्री गावोगावी जावून विक्री होत असल्याची माहिती जळगाव येथील कृषी विभागाला मिळाली होती.
माहितीच्या अनुषंगाने पाचोरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, पाचोरा पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम एस भालेराव,अरुण तायडेसह पाच जणांच्या पथकाने अचानक जारगाव येथील मधूकर शंकर भोकरे रा. शिवाजी नगर, पाचोरा यांचे मालकीचे गोडावूनवर छापा टाकला.
छाप्यात सदर गोडावून मधे २० लाख १९ हजार रुपये किमतीचे ७ टन बोगस रासायनिक खते आढळून आली. दरम्यान, गोडावून मालक मधूकर भोकरे हे फरार झाले असून त्यांनी हे
गोदाम बिहार राज्यातील रहिवासी असणार्या दोन युवकांना भाड्याने दिले असल्याचे समजते. हे दोन परप्रांतीय युवक शेतकर्यांना गावोगावी जावून बोगस खते विक्री करत असल्याचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव यांनी सांगितले. कारवाई पथकाने सात टन बोगस रासायनिक खते ताब्यात घेतले असून पाचोरा येथील पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत बिहार येथील दोन युवक फरार असल्याचे भालेराव यांनी सांगितले.