पारोळा तालुक्यात ४,९०७ बनावट नोंदींद्वारे शासनाची फसवणूक
पारोळा (प्रतिनिधी): सरकारी यंत्रणेच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून बनावट जन्म दाखले तयार करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचे धागेदोरे पारोळा तालुक्यात मिळून आले आहेत. भाटपुरी ग्रामपंचायतीच्या लॉगिन आयडीचा गैरवापर करून चक्क ४,९०७ बोगस जन्म नोंदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी बिहारमधील एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय तुळशीराम मोरे (वय ५४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शासनाच्या Civil Registration System (CRS) या पोर्टलवर भाटपुरी ग्रामपंचायतीच्या MH02609RE या आयडीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद नोंदी होत असल्याचे निदर्शनास आले होते. सखोल चौकशीअंती, २०१० ते २०२५ या कालावधीत एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावरून तब्बल ४,९०७ ऑनलाइन जन्म नोंदी केल्याचे समोर आले.
या गुन्ह्याचा तपास केला असता, ८७९७३६५३९७ या मोबाईल क्रमांकावरून हे सर्व बनावट रेकॉर्ड तयार करण्यात आले होते. हा क्रमांक आदर्शकुमार उर्फ विक्की अशोक दुबे (रा. पंडितपूर, सारण, राज्य-बिहार) याच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने भाटपुरी ग्रामपंचायतीच्या अधिकृत आयडीचा वापर करून शासनाची मोठी आर्थिक आणि प्रशासकीय फसवणूक केली आहे. पारोळा पोलिसांनी या प्रकरणी संशयित आदर्शकुमार दुबे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
पोलीस निरीक्षक अशोक पवार (पारोळा पोलीस स्टेशन) हे तपास करीत आहे. संशयित आरोपीला अद्याप अटक झालेली नसून, या घोटाळ्यात अन्य कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. एका छोट्या गावाच्या आयडीवरून पाच हजारांच्या जवळपास बोगस दाखले निघाल्याने जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.









