बोदवड शहरात घडली घटना
बोदवड ( प्रतिनिधी ) – शहरातील मध्यवर्ती भागातील गौरीशंकर व्यापारी संकुलातील सिटी बूट हाउस आणि लकी मल्टिपर्पज मोबाइल ही दोन दुकाने रात्री सुमारे १ वाजता तिघा चोरट्यांनी फोडून अंदाजे दीड लाखापेक्षा जास्त किमतीचे मोबाइल, बूट आणि रोकड, असा ऐवज लंपास केला. बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरीशंकर व्यापारी संकुलातील पहिल्या गाळ्यात सिटी बूट हाउस आहे. चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यांनी बुटांबरोबरच गल्ल्यातील २ हजार रुपयांची रोकड घेऊन साहित्याची नासधूस केली. त्यानंतर शेजारील लकी मल्टिपर्पज मोबाइल दुकान फोडून विविध कंपन्यांचे सुमारे १० मोबाइल, किंमत अंदाजे दीड लाख रुपये, तसेच काही दुरुस्तीचे मोबाइल चोरून चोरटे पसार झाले. दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणाही त्यांनी तोडून टाकली. तर सकाळी दुकानदारांनी दुकान उघडताना चोरीचा प्रकार समोर आला. संकुलातील इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत तीन चोरटे स्पष्ट दिसत असून, त्यांचे वय साधारण ‘२५ ते ३०’ वर्षे असावे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बोदवड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









