बोदवड तालुक्यातील मनूर येथील घटना
बोदवड ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मनुर येथे मंगळवारी रात्री एकाच वेळी ७ घरे व १ किराणा दुकान चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. या घरफोड्यांमधून चोरट्यांनी सुमारे ३ तोळे सोने व ५० हजारांहून अधिक रोकड लंपास झाली आहे.
विठ्ठल ओंकार शेळके यांच्या घरातील सदस्य बाजूच्या खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी घरातील रोकड चोरून नेली तसेच कपाटातील साहित्याची नासधूस केली. संतोष वामन वाघ यांच्या घरातून सुमारे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. तसेच देवकाबाई प्रकाश देवकर यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. याचबरोबर बाबूराव पाटील, विलास देवकर, कैलास शेळके आणि सीताराम तुकाराम सोनवणे यांच्या घरातही चोरी करण्यात आली. ज्या घरांमधून काही हाती लागले नाही, त्या ठिकाणी चोरट्यांनी कपाटातील साहित्य फेकाफेक करत मोठ्या प्रमाणात नासधूस केली. सकाळी नेहमीप्रमाणे घरमालक झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या चोरीच्या घटनांची माहिती मिळताच पोलिस पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांना कळविले. यासंदर्भात बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.









