चार जणांविरोधात गुन्हा दाखल
बोदवड ( प्रतिनिधी ) – तालुक्यात जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तब्बल १८ लाख २१ हजार ६७० रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बोडवड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शिवाजी गोविंदा कोळे (वय ४७, व्यवसाय शेती, रा. मौजे मनूर बु., ता. बोदवड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींनी जमिनीच्या खरेदीच्या नावाखाली फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, आरोपींनी गट क्रमांक २६८/१, मौजे मनूर बु. येथील १.२७ हेक्टर जमीन विक्रीसाठी देण्याचे ठरविले होते. या व्यवहारात दरमहा तीन टक्के व्याजाने ८ लाख रुपये कर्ज घेण्यात आले. प्रत्यक्षात फिर्यादीकडून देय असलेली रक्कम १० लाख ६४ हजार रुपये इतकी असताना, आरोपींनी त्यांच्याकडून जबरदस्तीने व फसवणुकीने १८ लाख २१ हजार ६७० रुपये उकळले.
इतकी रक्कम पूर्ण देऊनही संबंधित जमीन फिर्यादीच्या नावावर न करता आरोपींनी विश्वासघात केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामुळे फिर्यादीची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड करीत आहे.









