जळगाव (प्रतिनिधी ) ;-मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये पाय घसरून तो बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली असून गोपाळ माळी (वय ३५) असे या तरुणाचे नाव आहे.
बोदवड शहरात रेणुका नगर येथे राहणारा व्हॅन चालक गोपाळ माळी हा आपली आई, मावशी, पत्नी व दोन लहान मुलांसह स्वतःच्या मालकीच्या गाडीने गुरुवारी ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी गेला होता. रात्री दहा वाजता ते ओंकारेश्वर येथे पोहोचले. शुक्रवारी पहाटे पाच वाजता तो नर्मदा नदीपात्रात आंघोळीसाठी गेला असता पाय घसरून नदीत बेपत्ता झाला. बारा तास पाणबुडे व पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र अद्याप त्याचा शाेध लागू शकलेला नाही.त्याचा स्थानिक प्रशासनाकडून शोध घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.








