नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषीसेवा विधेयक, 2020 ही दोन कृषी विधेयके राज्यसभेत गदारोळात मंजूर करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
“कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा” असं म्हणत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच कृषी विधेयकं मंजूर करताना उपसभापतींनी केलेल्या दाव्याचं त्यांनी खंडन केलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. विधेयकं मंजूर करताना विरोधक जागेवर बसले नाही असं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी म्हटलं होतं. मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. यावरून राहुल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.