महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचाराचा ‘शंखनाद’ उद्या
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उद्या रविवार, ४ जानेवारी रोजी होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळा येथील भवानी मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडला जाणार असून, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महायुतीची प्रचंड जाहीर सभा पार पडणार आहे.

या सोहळ्याला महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकाच मंचावर येणार आहेत. यामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, माजी मंत्री संजय सावकारे, खा. स्मिताताई वाघ, माजी मंत्री आ. अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत सोनवणे, आ.किशोर पाटील, आ. अमोल जावळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. अमोल पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महानगरपालिकेच्या ७५ ही जागांवर महायुतीने कंबर कसली असून, या प्रचार शुभारंभ प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
पिंप्राळा येथील भवानी माता मंदिरात सायंकाळी ५ वाजता धार्मिक विधी व नारळ फोडून प्रचाराला सुरुवात होईल आणि त्यानंतर लगेचच भव्य जाहीर सभेद्वारे निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल. जळगाव शहराच्या विकासासाठी आणि महायुतीच्या विजयासाठी या ऐतिहासिक सभेला महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विष्णू भंगाळे आणि संजय पवार यांनी केले आहे.









