भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप, जळगाव एसपींची घेतली भेट
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सुमारे २.२४ लाख अपात्र व बेकायदेशीर व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्याविरोधात माझा लढा सुरूच राहणार आहे. सिल्लोडमध्ये पुरावे सादर केल्यानंतर सोमय्या जळगावात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेण्यासाठी आले. मात्र पोलिसांनी गांभीर्याने प्रकरण घेतले नसून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी दि. १ सप्टेंबर रोजी पत्रकारांना दिली.
सोमवारी सोमय्या हे जळगावात आले होते. त्याआधी ते सिल्लोड येथे गेले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे हल्ला झाला. सोमय्या हे ११०० बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या फसवणुकीसंदर्भात पुरावे सादर करण्यासाठी सिल्लोड येथील पोलिस व तहसीलदार कार्यालयात गेले असता, कार्यालयाबाहेर काही जणांनी त्यांच्या वाहनावर हल्ला चढवला. मात्र सीआयएसएफ कमांडोंच्या सतर्कतेमुळे जीव वाचल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोमय्या म्हणाले, “माझ्या वाहनावर पाच जणांनी हल्ला केला. हा प्रकार उद्धव ठाकरे गट, काँग्रेस किंवा अब्दुल सत्तार यांच्या निकटवर्तीयांनी केला असो, पण दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. सीआयएसएफ सुरक्षा दलाने वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे मी सुखरूप आहे.”
जळगाव भेटीत त्यांनी जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या ४२ बांगलादेशी नागरिकांचा मुद्दाही उपस्थित केला. “या प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. ४३ जणांनी तहसीलदारांचे खोटे हस्ताक्षर वापरून प्रमाणपत्र घेतले आहेत. त्यांना आरोपी बनवलेच पाहिजे. पोलिसांना न्यायाधीश बनण्याचा अधिकार नाही. ज्यांनी खोटी कागदपत्रे दिली आहेत, त्यांच्यावर गुन्हा नोंदवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. सिल्लोड परिसरात मालेगावप्रमाणे वातावरण करण्याचा कट दिसून येतो आहे. बांगलादेशी व अपात्र लोकांविरोधात ठोस पावले उचलली नाहीत, तर मला थेट मुख्यमंत्र्यांशी बोलावे लागेल, असेही ते म्हणाले.