मुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या मेळाव्या निमित्त केलेल्या भाषणातून केवळ जळफळाट दिसून आला. त्यात काही नवीन नव्हतं, असं सांगतानाच या भाषणात भाजपची दहशत होती याचाच आनंद झाला, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे, केवळ गडबड गोंधळलेल्या पक्षप्रमुखाच्या भाषणाचा उत्तम नमुना होता. त्यांच्या भाषणात ना धड हिंदुत्व होतं, ना धड विकास होता, ना धड धर्मनिरपेक्षता होती. मी त्यांना सांगू इच्छितो, की काळ्या टोपी खाली मेंदू असतोच, पण तो मेंदू सत्ता मिळावी म्हणून टोप्या फिरवणारा नसतो, असा पलटवार भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेनेने सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याचे आयोजन करुन हिंदुत्वाबद्दलचे धडे दिले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका शब्दानेही सावरकरांची प्रशंसा का केली नाही, हा प्रश्न आहे. बहुधा ते आपल्या नव्या मित्रांना घाबरत असावेत, त्यांचे नवे मित्र सावरकरांबद्दल वारंवार अपमानास्पद विधानं करतात, असं राम कदम म्हणाले.