पुणे ( प्रतिनिधी ) – एका मुलाखतीत किरीट सोमय्या यांनी हात पाय तोडण्याचे आदेश होते असा गंभीर आरोप केला आहे. हीच सूचना पोलीस आयुक्त आणि शहराध्यक्षांनाही दिली होती,” असंही ते म्हणाले आहेत. “शारिरीक इजा फार झालेली नाही. पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशाप्रकारे कट कारस्थान करतं. अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावलं होतं. सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालतही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला असल्याचं समोर आलं आहे. किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांत प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. अनिल परब यांच्यावर तर कारवाईच सुरु झाली आहे. संजय राऊत. अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा सहभाग सापडला आहे. त्यांनी ठरवून हे केलं,” असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
“स्थानिक पोलीस नाही तर मुख्यमंत्री कार्यालय यामागे होतं. मुख्यमंत्री कार्यालयातून संजय राऊत, अनिल परब आणि पाटणकर या तिघांना वाचवण्यासाठी किरीट सोमय्याला दोन चार महिने शांत करण्याचा कट होता. किती मोठे दगड हातात होते. शनिवारी सुटु्टी होती. एक कर्मचारी कामावर नव्हता. मग हे १०० लोक आत कसे घुसले? शिवसेनेचे कार्यकर्ते हातात काठ्या दगड घेऊन कसे पोहोचले? झेड सेक्युरिटी असणाऱ्या व्यक्तीसाठी पोलिसांनी आधी जाऊन पाहणी करायची असते. त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच सीआयएसएफ कमांडो आत जाता. हे सर्व त्यांनी मिळून केलं,” असाही आरोप सोमय्यांनी केला.
“मी पालिका आणि पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. गृहसचिवांना पत्र लिहिलं आहे. राज्यपालांची भेट घेणार आहे, कारवाईची मागणी करणार आहे. स्थानिक पोलीस अधिकारी, पालिकेचा सुरक्षा प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयाने जाब दिला पाहिजे,” असंही ते म्हणालेत.