जळगावात सकाळी रस्ता रोको, जिल्हाधिकारी, एसपींना निवेदन
मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी, एसपी यांची गावात भेट
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बिलवाडी या गावामध्ये काल रविवारी दि. १४ रोजी सकाळी २ कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्या वादातून हाणामारी होऊन एका ५५ वर्षीय इसमाचा खून करण्यात आला होता. तर ११ जण जखमी झाले. सोमवारी सकाळी मृतदेह ताब्यात न घेता गोपाळ कुटुंबीय व ग्रामस्थांनी सुरुवातीला आकाशवाणी चौकात चक्का जाम केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे घोषणाबाजी करून नंतर जिल्हाधिकारी व पुढे एसपी कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. त्यानंतर गावात अंत्यविधी सुरु असताना मात्र दुसरीकडे संशयित आरोपींच्या घराच्या अंगणात दुचाकीची जाळपोळ करून वस्तूंची नासधूस करण्यात आली. त्यामुळे बिलवाडी गावात तणावपूर्ण शांतता आहे.
या घटनेमध्ये मयत पावलेले एकनाथ गोपाळ यांचा मृतदेह जोपर्यंत सर्व आरोपींना ताब्यात घेतले जाणार नाही तोपर्यंत आम्ही शव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. सकाळच्या सुमारास गोपाळ कुटुंबातील सर्व नातेवाईक व ग्रामस्थांनी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकामध्ये महामार्गावर रास्ता रोको केला.(केसीएन)त्या रास्ता रोकोनंतर त्यांनी पायीच मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व तेथे निवेदन दिल्यावर ते पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व अंत्यसंस्कारासाठी सर्व कुटुंबीय गावामध्ये आले. बिलवाडी गावात आल्यानंतर एकीकडे अंत्यसंस्कार सुरू असताना दुसऱ्या बाजूला काही लोकांनी या घटनेतील जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या घरी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हल्ला केला.
या हल्ल्यात त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी जाळपोळ झाली. यामध्ये फ्रिज, दुचाकी तसेच डाळी असलेल्या सर्व फेकून नासधूस केली. गावामध्ये एका ठिकाणी एका चारचाकीची तोडफोड झाली आहे. एका घरावर जाळपोळीचा प्रयत्न झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी आले.(केसीएन)कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून पूर्णतः दक्षता घेतली आहे. आता या ठिकाणी सर्वत्र शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात करण्यात आलेला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. दोन संशयित अद्याप फरार असून त्यांचाही शोध घेणे चालू आहे.