जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बिलवाडी गावात जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या घटनेत एकनाथ निंबा गोपाळ (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सर्व जखमींवर सध्या जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.बिलवाडी गावातील गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या १० वर्षांपासून जुना वाद सुरू आहे. शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील एका व्यक्तीची दुचाकी पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवल्याने त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यावेळी काही प्रमाणात समजूत काढण्यात आली होती.
आज रविवारी दुपारी एकनाथ गोपाळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य गावातील ग्रामपंचायतीच्या बांधकामावर कामासाठी गेले होते. याच ठिकाणी पाटील कुटुंबातील काही सदस्य आले. यावेळी दोन्ही गटांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारीसाठी बांधकामाच्या साहित्याचा, पावडी आणि लाकडी दांड्याचा वापर करण्यात आला. याच हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही कुटुंबांमधील एकूण ११ जण जखमी झाले आहेत.
त्यात किरण देविदास पाटील (वय २८), मिराबाई सुभाष पाटील (वय ४५), ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (वय ४०), दीपक ज्ञानेश्वर पाटील (वय २३), संगीता रोहिदास पाटील (वय ४०) आणि दुसऱ्या गटातील जनाबाई एकनाथ गोपाळ (वय ५५), एकनाथ बिलाल गोपाळ (वय ३५), गणेश एकनाथ गोपाळ (वय २३), भीमराव एकनाथ गोपाळ आणि कमलेश प्रमोद पाटील (वय २६) यांचा समावेश आहे.
घटनेनंतर संतप्त झालेले गोपाळ कुटुंबिय आणि नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत रुग्णालयात ठिय्या मांडला. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.