जळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – नूतन मराठा महाविद्यालयाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बांधकाम व्यावसायिकाचे ऑफिस बुधवारी रात्री चोरट्यांनी फोडले. ऑफिसमधून दोन ठिकाणी ठेवलेले ५८ हजारांची रोकडसह संगणक व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर चोरुन नेला आहे. यां प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नूतन मराठा शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकान नंबर २५ मध्ये शेलिनो बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेटचे ऑफिस आहे. येथे कर्मचारी असलेल्या मनिष राजाराम पाटील यांच्या तक्रारीनुसार दिनांक १८ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी हा मुद्देमाल लांबवला. चोरट्यांनी ऑफिसमधील मोठ्या कपाटात बांधकाम मजुरांना मजुरी देण्यासाठी ठेवलेले ५० हजार व टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ऑफिस खर्चासाठी ठेवलेले साडेआठ हजार अशी ५८ हजार ५०० रुपयांची रोकड, एक जुना संगणक सेट, सीसीटीव्ही, डीव्हीआर सेट चोरुन नेला.
चोरट्यांनी दुकानाचे शटर व आतील काचेच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन चोरी केली. चोरट्यांनी ऑफिसमधील कागदपत्र, प्लॅन व इतर साहित्य अस्ताव्यस्त केले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अनिता वाघमारे करीत आहेत.