आ. सत्यजित तांबे यांचा आरोप, जळगावात घेतल्या बैठका
जळगाव (प्रतिनिधी) – सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली जाते. राज्यात अनेक ठिकाणी शिक्षणाधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकले आहेत. स्वतः शिक्षण आयुक्तांनी काही अधिकाऱ्यांची यादी देऊन त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली आहे. ही सारी परिस्थिती पाहता महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा खासगी मेडिक्लेम कंपन्यांच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले कॅशलेस व्हावीत, अशी माहिती शिक्षक आ. सत्यजित तांबे यांनी पत्रकारांना दिली. ते सोमवारी १२ जून रोजी जळगावात आले होते.
आ. सत्यजित तांबे यांनी जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या अडीअडचणी संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न, वैद्यकीय बिले, पेन्शनर्स शिक्षकांची ग्रॅज्युएटी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या सर्व प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढू असं, आश्वासन यावेळी तांबे यांनी शिक्षकांना दिलं. राज्य सरकारकडे अडकलेला निधी व अनुदानाच्या बाबतीतही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.
बैठक झाल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय बिले कॅशलेस करायला हवीत. त्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे, असेही आ. तांबे म्हणाले.