आमदार मंगेश चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन!
चाळीसगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक ७ मध्ये नुकतीच एक अत्यंत उत्साही आणि प्रभावी जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत चाळीसगावच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन त्यांच्यासमोर मांडले आणि आगामी निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचे कळकळीचे आवाहन केले.

विकासाचे व्हिजन आणि बिहारचा दाखला
नागरिकांशी संवाद साधताना आमदार चव्हाण यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “बिहारमध्ये जो ऐतिहासिक निकाल लागला, त्यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की जनतेसमोर पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांचा अपयशी कारभार उघड झाला आहे. विकासाला खीळ घालणाऱ्यांना पुन्हा संधी देण्याची जनतेची इच्छा नाही. विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवत तेथील जनतेने भाजपाला एकतर्फी विजय दिला.” पुढे ते म्हणाले, “हेच सत्य आज देशभरातील सामान्य नागरिकांच्या मनात खोलवर आहे. जनता आता केवळ व्हिजन आणि विकास करणाऱ्यांनाच पाठिंबा देणार आहे.”’जुगलबंदी’ नव्हे,

चाळीसगावच्या भवितव्याची निवड!
चाळीसगाव नगरपालिकेची ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांमधील लढत नसून, ती चाळीसगावचे भवितव्य आणि आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य निवडण्याची संधी आहे, असे आ.मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले. ”एकेकाळी एकमेकांवर कुरघोड्या करणारी शहर विकास आघाडी आणि उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आज केवळ सत्तेसाठी एकत्र आली आहेत. त्यांच्याकडे ना ठोस व्हिजन आहे, ना विकासाची खरी बांधिलकी,” अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

३५ वर्षे विरुद्ध ३५ महिन्यांची कामगिरी
आमदार मंगेश चव्हाण यांनी विरोधकांच्या ३५ वर्षांच्या कारभाराची तुलना स्वतःच्या ३५ महिन्यांच्या कामाशी केली. ते म्हणाले, “विरोधकांचे ३५ वर्षे आणि माझे ३५ महिने – यातील बदल, कामगिरी आणि विकास जनतेसमोर आज स्पष्ट दिसत आहे.” त्यांनी जनतेला आवाहन केले की, विकासाच्या या बदलाला आणखी मजबूत करण्यासाठी ही निवडणूक जनतेनेच हातात घ्यायची आहे. “म्हणूनच चाळीसगावला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी,” ते म्हणाले, “भाजपाचा नगराध्यक्ष आणि सर्वच भाजपचे नगरसेवक उमेदवार यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन चाळीसगावला विकासाच्या मार्गावर आणखी मजबूत करण्याचे आवाहन आ. मंगेश चव्हाण यांनी केले.









