जामनेर तालुक्यातील शहापूर परिसरातील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शहापूर शिवारात चार दिवसापुर्वी नदीत मृत अवस्थेत बिबट्या आढळला होता. पुन्हा शहापूर शिवारात बिबट्याने एका गोऱ्हाचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी दिनांक ६ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून आहे.
जामनेर तालुक्यातील शहापूर शिवारात शेतकरी संतोष गिरधर पाटील हे शेतात गुराला चारा टाकण्यासाठी गेले असता त्यांना गोऱ्हा मृत झालेला दिसून आला. गो-हा हा पाच वर्षाचा होता. बिबट्याने गोऱ्हा याच्यावर हल्ला करून ठार केलेले त्यांना दिसून आले. यानंतर सदरील घटनेची माहिती वनविभागाला कळवली.
अमोल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रशांत पाटील ,वनरक्षक अशोक ठोंबरे सर, खंडारे, संदीप जोगी पाटील, संदीप चौधरी, जीवन पाटील इत्यादी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. शेतकऱ्याला मार्गदर्शन करून आपले जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी अशा सूचना दिल्या असून वन विभागाने लवकरात लवकर या बिबट्याला पिंजरा लावून जेरबंद करावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.









