पाचोरा तालुक्यातील लोहारा शिवारातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील लोहारा-कासमपुरा शिवारात एका बिबट्याने दावणीला बांधलेल्या वासरीचा फडशा पडल्याची घटना शुक्रवारी दि. २४ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी वनविभागाने पंचनामा केला. मात्र आता शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.
लोहारा गावचे शेतकरी उस्मान खा सुलेमान खॉ (वय ३५) हे परिवारासह राहतात. त्यांनी लोहारा ते कासमपुरा शिवारात त्यांचा शेतात काही गुरे बांधून ठेवली होती. त्यातील एका वासरीचा शुक्रवारी पहाटे बिबट्याने फडशा पाडला. सकाळी शेतकरी उस्मान खॉ हे शेतात आले असताना त्यांना सकाळी ८ वाजेच्या सुमारास हि घटना दिसली. त्यांनी तातडीने वनविभागाला कळविले.
वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच, माहिती घेतली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.