सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील घटना
जरंडीच्या रावेरी शिवारात शेतीच्या गट क्र-३३ मध्ये शेतकरी संजय राजाराम मोरे यांचा बैल चरत असताना झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने चक्क शेतकरी २० फुटावर असताना बैलांवर झडप घालून बैलाचा फडशा पाडला. त्यानंतर सोनल संजय मोरे (वय १७) यांचेसह दिलीप गाडेकर (४०) या दोन्ही शेतकऱ्याचा पाठलाग करून त्यांचेवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेमुळे परिसरातील कापूस वेचणी मजूर घरी पळाले.
दरम्यान या घटनेत शेतकरी संजय मोरे यांचे ३५ हजारचे नुकसान झाले आहे. सदर बिबट्या हा तीन दिवसांपासून जरंडी, रावेरी शिवारात धुमाकूळ घालत असल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली होती. तरीही वनविभाग पथक घटनास्थळी पंचनाम्यासाठी न आल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता. बिबट्याला पिंजरे लावून बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान चवताळलेला बिबट्या शेतात डरकाळ्या फोडत असतांना भेदरलेले कापूस वेचणी मजूर भीतीने थेट रस्त्यावर आले होते. दरम्यान या बिबट्याने बैलाचा फडशा पाडल्या नंतर शेतातील रोहीच्या कळपाचा पाठलाग करत बिबट्याने धूम ठोकली आहे.