अमळनेर तालुक्यात फापोरे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील फापोरे-मंगरूळ रस्त्यावर बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी उघडकीस आली. बिबट्या चिखलात रुतलेला असल्याने त्याचा निमोनियाने किंवा विषबाधेने मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
बिबट्याने एक पारडू फस्त केले होते. वनविभागाने त्याचा पंचनामा करून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र २७ रोजी सकाळी फापोरे मंगरूळ रस्त्यावरील रमेश प्रकाश पाटील यांच्या गट नंबर ३७७ मधील शेतात बिबट्या चिखलात रुतलेला मृत अवस्थेत आढळून आला.(केसीएन)सहाययक वनसंरक्षक अमोल पंडित , वनपरिक्षेत्र अधिकारी श्यामकांत देसले, मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, पशु वैद्यकीय विकास अधिकारी प्रतिभा कोरे , बोराखेडे ,मुकेश पाटील , वनपाल पी जे सोनवणे, वैशाली गायकवाड, दिलीप पाटील , वनरक्षक सुप्रिया देवरे , रामदास वेलसे, रोहिणी सुर्यवंशी, स्वाती खैरनार, वनमजुर यांनी घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे शव जानवे जंगलात नेऊन त्याठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले.
त्यानंतर त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याचे वय ४ ते ५ वर्ष असावे.त्याचे सर्व अवयव शाबूत होते. कोठेही मार लागलेला अथवा जखमा नव्हत्या. मात्र तो चिखलात रुतल्याने त्याला निमोनिया झाला असावा किंवा काहीतरी खाल्ल्याने विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. तो अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण उघडकीस येईल असे सांगण्यात आले.