भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- येथील वांजोळा रोड परिसरात असलेल्या रेणुका माता मंदिर रस्त्यावर बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक आगीने मोठा भडका घेतला. राणे ब्रदर्स यांचे दिनेश टेन्ट हाऊस हे जळून खाक झाले. यावेळी टेन्टचे मालक कुशल राणे यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. आगीमध्ये सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले आहे.
भुसावळ येथील अग्रिशमन दल, नगर परिषदेचे कर्मचारी, ऑर्डनन्स फॅक्टरी व अन्य भागातून मोठ्या प्रमाणावर अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. सुमारे अडीच ते तीन तास या कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आगीशी झुंज दिली. मात्र आगीचे रुप इतके रौद्र होते की, या वेळात या संपूर्ण टेन्ट हाऊसमध्ये काडी देखील शिल्लक राहिली नाही. सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचे टेंटचे सामान जळून खाक झाले.
घटनास्थळी तहसीलदार निता लबडे, बाजारपेठ पोलीस कर्मचारी, अधिकारी यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. दरम्यान आगीचा वेग पाहता परिसरातील घरे देखील रिकामी करण्यात आली. ज्या ठिकाणी आग लागली तेथून अवध्या दहा-बारा फूट अंतरावर एक विवाह सोहळा होता व तो सोहळा नुकताच आटोपला व नवरीची विदाई सुरू असताना हा आक्रोश पाहायला मिळाला. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झालेली आहे.
शहरातील दिनेश टेन्ट हाऊस यांचे मालक कुशल राणे व त्यांच्या मित्रांनी मोठ्या जिद्दीने हा व्यवसाय उभा केला होता. घटनास्थळी तीन सिलेंडर होते, त्यातील दोघांचा भयंकर असा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने परिसर दणाणला होता. यामुळे या टेन्ट हाऊसची वरील छत्त पूर्णपणे खाली कोसळले.