मध्यप्रदेशातून मुद्देमाल हस्तगत
जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ येथील एका विवाह सोहळ्यातून दागिन्यांची पर्स लांबवणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातून मुद्देमाल जप्त केला आहे.


दिनांक ६ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील बालाजी लॉनमध्ये फिर्यादी उज्वला प्रबोध भावे यांच्या मुलाचा विवाह सोहळा सुरू होता. यावेळी नववधूचे दागिने एका पर्समध्ये ठेवलेले होते. लग्नविधी सुरू असताना दुपारी ४ ते ४:३० च्या सुमारास सोफ्यावर ठेवलेली ही पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हे मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील कडीया सांसी येथील असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांचे एक पथक १९ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेशात तळ ठोकून होते. तपासादरम्यान समजले की, आरोपी कृषी निरज बेडीया याने चोरीचे काही दागिने त्याचे नातेवाईक नरोत्तम सिसोदिया यांच्याकडे ठेवले होते. अखेर उपसरपंच संजय सिसोदिया यांच्या मध्यस्थीने हे दागिने पोलिसांत हजर करण्यात आले.
पोलिसांनी या कारवाईत एकूण १,९२,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर दागिने फिर्यादींनी ओळखले असून ते पुढील तपासासाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शरद बागल, रवी नरवाडे, अंमलदार गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, प्रमोद चालक या पोलीस पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.








