८७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास
भुसावळ (प्रतिनिधी):- शहरातील जुना सातारा भागातील राम मंदिराजवळ असलेल्या एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महेंद्र शरद पाटील (५२, रा. जुना सातारा, भुसावळ) हे दि. ५ डिसेंबर रोजी कामानिमित्त सोलापूर येथे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील हॉलमध्ये असलेल्या कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले. दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी कपाटातून वस्तू लंपास केल्या आहेत.
यात सोन्याची चैन, सोन्याची २ अंगठी असा किंमत अंदाजे ८७,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी महेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इक्बाल सय्यद हे करत आहेत.









