धुळे तालुका पोलिसांची कामगिरी
धुळे (प्रतिनिधी) :- पैसे पाच पट करण्याच्या आमिषाला बळी पडून भुसावळ येथील एका तरुणाची ४० हजार रुपयांत फसवणूक झाल्याची घटना धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे शुक्रवारी घडली होती. धुळे तालुका पोलिसांनी या जबरी चोरीचा छडा लावत अजनाड, ता. धुळे येथील दोघांना लाखाच्या मुद्देमालासह जेरबंद केले.
सौरभ जव्हेरीलाल कोटेचा (वय ३०, रा. भुसावळ, जि. जळगाव) या तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहिला होता. त्यामध्ये ‘लाखाला पाच लाख’ आणि ‘दोन लाखाला दहा लाख’ रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून सौरभ याने संशयिताशी संपर्क साधला. आरोपींनी त्याला पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी कुसुंबा गावाबाहेर, उड्डाणपुलाखाली मालेगाव रोडवर एका निर्जन ठिकाणी बोलावले. १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सौरभ ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. तिथे रेवलाल पवार आणि जगराज भोसले (दोघे रा. अजनाडे, ता. धुळे) हे दोघे संशयित आरोपी उपस्थित होते. त्यांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि सौरभ याच्याकडील ४० हजार रुपये हिसकावून घेतले.
यावेळी सौरभने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने १५ रोजी अजनाडेत संशयित आरोपी रेवलाल पवार (वय ४५) आणि जगराज किरसिंग भोसले (वय ३९) या दोघांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एमएच-१८ ऐएच-१६६१ क्रमांकाची दुचाकीसह चाकू आणि ४० हजारांची रोकड असा एकूण लाखाचा मुद्देमाल जप्त केला.









