राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे विजयी
भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथे धक्कादायक निकाल लागला असून मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताई सावकारे यांना पराभवाचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गायत्री चेतन भंगाळे हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे एससी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. यावरून विरोधकांनी टिका केली. आणि निवडणुकीच्या काळात हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. तर निवडणुकीच्या प्रारंभीच भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांचा उत्साह शिगेला पोहचला. तथापि, या निवडणुकीत विरोधकांची एकजूट न होता अनेक उमेदवार उभे राहिल्याने ही लढत बहुरंगी झाली.
काँग्रेसच्या वतीने सवीता सुरवाडे यांना उमेदवारी मिळाली. फायरब्रँड नेते जगनभाई सोनवणे यांच्या पत्नी पुष्पाताई सोनवणे यांनी देखील उमेदवारी केली. तर ऐन वेळेस राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील आपला उमेदवार मैदानात उतारला. यामुळे येथील लढाई ही बहुरंगी झाली. या निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथे प्रचारसभा घेतली. यासोबत रक्षाताई खडसे, गिरीशभाऊ महाजन यांच्या सारख्या नेत्यांनी देखील सभा घेतल्या. तर विरोधकांकडून आ. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद आणि सभेच्या माध्यमातून मैदान गाजविले. तरी प्रचाराची खरी सुत्रे ही संतोष चौधरी आणि अनिल चौधरी या बंधूंनी सांभाळली.
या पार्श्वभूमिवर, आज रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये रजनी सावकारे यांनी आघाडी घेतली. हळूहळू ही आघाडी दहा हजारांच्या पलीकडे गेल्याने त्यांचा विजय होणार असल्याचे मानले जात होते. मात्र शेवटच्या फेऱ्यांमध्ये गायत्री भंगाळे यांनी जोरदार कमबॅक केले. शेवटी तर अतिशय अटीतटीची चुरस निर्माण झाली. यातून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी ६२७ मतांनी विजय संपादन केला.या अनपेक्षीत पराभवामुळे मंत्री संजय सावकारे यांना जबर धक्का बसला असून माजी आमदार संतोष चौधरी यांनी तब्बल नऊ वर्षानंतर कमबॅक केले आहे. हा पराभव भुसावळच्या राजकारणाची आगामी दिशा दर्शविणारा ठरू शकतो असे मत राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केले आहे.









