५५१ प्रकरणातून ३ लाखांचा दंड वसूल
भुसावळ (प्रतिनिधी) : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कडक भूमिका घेत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम राबवली. व्यापक मोहीम पार पाडण्यासाठी वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांची एक समर्पित टीम तयार करण्यात आली. मंगळवारी दि. १४ मे रोजी भुसावळ, खंडवा, बडनेरा, अकोला, मनमाड, नासिक रोड स्टेशन येथे अनधिकृत फेरीवाले विरोधात कडक मोहीम राबवली.
या मोहिमेमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे आणि वाणिज्य विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. ज्यामध्ये ३५ आरपीएफ अधिकारी आणि कर्मचारी. आणि ५२ वाणिज्य विभागाचे कर्मचारी (वाणिज्य निरीक्षक आणि TTE) या कारवाईत सहभागी होते . या मध्ये एकूण ३२ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली. एकूण ४५७ विना तिकीट प्रवास करताना, ४९ केसेस रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छता करताना कारवाई केली आणि १० केसेस धूम्रपान करताना, ३ केसेस रेल्वे मार्ग पार करताना कारवाई करण्यात आली. अशा एकूण ५५१ प्रकरणातून एकूण २,९९,६६३/- रु. दंड वसूल करण्यात आला.
रेल्वेच्या आवारात किंवा गाड्यांमध्ये अनधिकृतपणे विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.