भुसावळात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ (प्रतिनिधी):- शहरातील हॉटेल व्यवसायिक आपल्या कामावरून घरी परतत असताना, एका अज्ञात तरुणाने त्यांना अडवून मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रवींद्र सुरेश जगताप (वय ४५, रा. दीनानगर, भुसावळ) हे दि. १२ मार्च रोजी रात्री १२:१५ ते १२:४५ च्या सुमारास आपले हॉटेल बंद करून दुचाकीने घरी जात होते. जळगाव रोडवरून भिरुड हॉस्पिटलमार्गे शिकलकर वाड्याकडून जात असताना, मागून एका तरुणाने ‘बर्गमन’ मोपेड गाडीने येत त्यांना दोन वेळा ओव्हरटेक केले. बियाणी स्कूलजवळ त्या तरुणाने आपली दुचाकी जगताप यांच्या गाडीसमोर आडवी लावून त्यांना थांबवले.
जगताप यांनी विचारणा केली असता, त्या तरुणाने त्यांना शिवीगाळ करत “तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे काढून दे” अशी धमकी दिली. जगताप यांनी पैसे नसल्याचे सांगताच, संतप्त झालेल्या आरोपीने त्यांच्या गालावर चापट मारून मारहाण केली आणि त्यांच्या शर्टच्या खिशात असलेला १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकाँ. विजय नेरकर हे करत आहेत. शहरात रात्रीच्या वेळी घडलेल्या या लुटीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.









