यावल तालुक्यात निमगाव येथे घडली घटना : भुसावळात शोककळा
जळगावच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरातील पपईचे व्यापारी हे रविवारी सकाळी यावल येथील कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील निमगावजवळ अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यासह असणारे त्यांचे २ नातेवाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
शेख इरफान शेख मुश्ताक बागवान (वय ४४, रा. जाममोहल्ला, भुसावळ) असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे. ते आई, पत्नी, भाऊ, २ मुले, १ मुलगी यांच्यासह राहत होते. पपई विक्री करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान, रविवारी दि. ३ रोजी ते नेहमीप्रमाणे शालक दानिश फकिरा बागवान (वय ३०) आणि सय्यद शकील बागवान (वय ४०, दोन्ही रा. जाममोहल्ला, भुसावळ) यांना सोबत घेऊन भुसावळ येथून यावल येथील कार्यालयात सकाळी ११ वाजेला निघाले होते. यावल तालुक्यात निमगावजवळ त्यांची दुचाकी आली असता एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
या धडकेत शेख इरफान, दानिश आणि सय्यद शकील गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर उपचारादरम्यान शेख इरफान यांचा मृत्यू झाला आहे. दानिश व सय्यद शकील यांच्यावर भुसावळ येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(केसीएन)शेख इरफान यांचा मृतदेह हा शवविच्छेदनकामी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी रुग्णालयात कुटुंबियांसह नातेवाईकांनी आक्रोश केला होता. व्यापाऱ्याच्या अपघाती मृत्यूमुळे भुसावळ शहरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होते.