भुसावळ शहरातील खडका चौफुलीजवळ झाला अपघात
भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील खडका चौफुलीजवळ झालेल्या अपघातात जळगाव येथील ५० वर्षीय रवींद्र बबन कोळी गंभीर जखमी झालेत. तर त्यांच्या सोबत असलेले शुभम सांगळे हे किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांत ८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शुभम सांगळे व त्यांचे शेजारी राहणारे रवींद्र कोळी हे दुचाकीने (एमएच १९ सीएल ७३९९) वरणगाव येथून जळगावकडे परतत होते. दरम्यान, खडका चौफुलीजवळ हायवेवरील सर्व्हिस रोडवर अचानक एक अज्ञात कार समोर आल्याने दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात दोघेही खाली पडले. यात शुभम सांगळे यांना किरकोळ इजा झाली तर रवींद्र कोळी यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. जखमींना तत्काळ भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.