हल्लेखोराला अटक
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील नारायण नगर येथील रहिवासी मित्रांसोबत दिव दमण येथे फिरायला गेला असताना तेथे एका तरुणाशी त्याचा वाद झाला. या वादातून त्या तरुणाने भुसावळच्या तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना दि. ३ एप्रिल रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
धीरज अरुण जाधव (रा. नारायण नगर, भुसावळ) असे या तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या काही मित्रांसोबत दिव दमण येथे फिरायला गेला होता. तेथे एका दमण धाब्यावर जेवायला गेला होता. अमरेलीजवळच्या धारी येथील एक तरुण प्रद्युम्न सिंह गोहिल हा एका महिलेसोबत आला होता. त्या महिलेला मयत धीरज याने इशारा केल्याचा संशय प्रद्युम्नला आला. त्यावरून धीरजला त्याने जाब विचारला. त्यावरून त्याचा वाद झाला. या वादातून सदर तरुणाने धीरज जाधव याच्या मानेवर चाकूने वार केला.
त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले .घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली असून धीरज जाधव याच्यावर शुक्रवारी दि. ५ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संबंधित पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील निवृत्त सहाय्यक फौजदार अरुण जाधव यांचा तो मुलगा होता. धीरज हा चुलत भाऊ भूषण आणि अविनाश जाधव व अन्यमित्रांसह गेला होता. तीन वर्षांपूर्वीच धीरजचा विवाह झाला होता. पुणे येथे एका नामांकित कंपनीत तो अभियंता होता.