अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील आठवडे बाजारातील ओम साई ट्रेडर्स दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून प्रतिबंधित असलेला गुटखा सुगंधित पान मसाला आणि तंबाखू असा एकूण ८८ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवार दि. ५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता दुकानदारावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील ओम साई ट्रेडर्स या दुकानावर शुक्रवारी दि. ५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता अन्न व औषध प्रशासनाचे विभागाने छापा टाकला. या ठिकाणी दुकानातून सुगंधित पान मसाला गुटखा आणि तंबाखू असे एकूण ८८ हजार ४४५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुकानदार विनयसिंग प्रल्हादसिंग पाटील (वय ३९, रा. म्हाडा कॉलनी, हनुमान नगर, भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश कोळी करीत आहे.