भुसावळमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत मध्यप्रदेशातून आलेले तीनजण जेरबंद
गावठी पिस्तूल, काडतुसे, चॉपरसह मोटारसायकली जप्त
भुसावळ – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवलेल्या गस्ती दरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री शहरात मोठी कारवाई करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या मध्यप्रदेशातील तीन संशयितांना पकडले. त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, चॉपर, दोर, मिरची स्प्रे तसेच तीन बिना नंबरच्या मोटारसायकली असे धोकादायक साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर इतर पाच साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.
बाजारपेठ पोलिसांचे अधिकारी व गुन्हे शोध पथक रात्री पेट्रोलिंग करत काळा हनुमान मंदिराजवळील भाजी मार्केट परिसरात पोहोचले असता काही संशयित युवक अंधारात पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. पाठलाग करून शुभम दुर्गाप्रसाद ओनकर (24), मृत्युंजय उर्फ भोला सत्येंद्र कविशेखर (43) आणि राजू उर्फ शिवकुमार भगवानदास माणिक (19, सर्व रा. मध्यप्रदेश) यांना रात्री ११ वाजेच्या सुमारास पकडण्यात आले.
पंचांसमक्ष त्यांच्या अंगझडतीतून मृत्युंजयच्या ताब्यात एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन आढळला. शुभमकडे चॉपर व मोबाईल तर शिवकुमारकडे दीर्घ दोर व मिरची स्प्रे मिळून आला. तसेच तीन बिना नंबरच्या पल्सर व अपाचे मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या.
चौकशीदरम्यान आरोपींनी कबुली दिली की ते मध्यप्रदेशातून भुसावळमध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले होते. स्थानिक सहकाऱ्यांनी त्यांना शहरातील सराफ बाजार आणि काही बंगल्यांची माहिती देऊन मार्गदर्शन केले होते. पळून गेलेल्या त्यांच्या पाच साथीदारांचीही नावे आरोपींनी उघड केली असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले असून पकडलेल्या तिघांबरोबरच पळून गेलेल्या आठ जणांसह एकूण 12 आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 310(4), 310(5), आर्म्स अॅक्ट 4/25 तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा 37(1), 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.









