बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी):- शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने श्रीराम नगर भागात सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.


जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक गस्तीवर असताना, श्रीराम नगर भागातील श्रीराम मंदिराजवळ एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली.
पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपी संदीप सुनील जाधव (वय २३, रा. कुमावत नगर, पंचवटी, नाशिक) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचे एक लोखंडी गावठी पिस्तूल (मॅगझीनसह) आणि १,००० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ. विजय बळिराम नेरकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. या कारवाईत पो.उपनिरीक्षक राजू सांगळे, म.पो.उप.निरी. भारती काळे, विजय नेरकर, कांतीलाल केदारे, भूषण चौधरी, अमर अढाळे, योगेश माळी, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, प्रशांत सोनार, जीवन कापडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा आणि हर्षल महाजन यांचा समावेश होता.









