ना. महाजन दांपत्याच्या हस्ते झाले भूमिपूजन
देवा विसपुते
जामनेर (प्रतिनिधी) : राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून जामनेर शहराच्या विकासासाठी ६४ कोटी ५ लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झालेला आहे. त्यातून शनिवार दि. १६ मार्च रोजी सकाळी दहा वाजता विविध विकासकामांचे भूमिपूजन मंत्री गिरीश महाजन आणि जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
जामनेर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी १३ कोटी ७३ लाख रुपये, नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान अंतर्गत जामनेर नगरपालिकेच्या हद्दीत नाट्यगृहाचे बांधकाम करण्यासाठी २५ कोटी, जय हिंद युथ क्लब येथे स्पर्धा परीक्षा व अभ्यासिका आणि वाचनालय सुरू करण्यासाठी बांधकाम करणे व डिजिटल करणे यासाठी ६० लक्ष रुपये यासोबत जामनेर नगरपरिषदेच्या मल निसारण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २५ कोटी २६ लाख रुपये असा एकूण ६४ कोटी ५ लाख इतका निधी मंजूर झालेला आहे.
ही गोष्ट जामनेर शहरवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. याकरिता शहरातील ओशिया माता नगर येथे गणपती नगरच्या पाठीमागे सकाळी १० वाजता विविध विकास कामांचे भूमिपूजन ना. गिरीश महाजन व नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेला विविध लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.